पंढरपूर : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खितपत पडून राहिला आहे. यावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आता थेट मुख्यमंत्र्याना आषाढी एकादशीची पूजा न करु देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पंढरपूर येथे झालेल्या राज्य बैठकीत हा निर्णय घेतला गेला.

राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे 58 मोर्चे निघाले पण सरकार आमची दखल घेत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत केला गेला. “आरक्षणाचा निर्णय होइपर्यंत मुख्यमंत्र्याना आषाढीची महापूजा करु देणार नसल्याचे”, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात राज्य मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत राज्य सरकारला लक्ष करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील पिडीत मुलीच्या कुटुंबानेही या बैठकीला हजेरी लावली होती.

अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील

पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुक मोर्चे बोलके होतील, असा गर्भित इशारा यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला होता.