पुणे : पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी जवळपास तासभर प्रवाशांनी रोखून धरली. पूर्वी ही ट्रेन प्लॅटफॉर्म 1 वरून सुटायची. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही ट्रेन प्लॅटफॉर्म 5 वरुन सोडण्यात येत होती. त्यामुळे ती पूर्वीप्रमाणेच 1 वरुन सोडण्यात यावी यासाठी मासिक पासधारक प्रवाशांनी आंदोलन केलं.
पुण्याहून मुंबईसाठी दररोज सकाळी 7.15 वाजता धावणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन सुटायची. प्लॅटफॉर्म 1 हा एन्ट्री गेटच्याजवळ आहे, त्यामुऴे ट्रेन पकडणं प्रवाशांना सोयीस्कर होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरुन सोडली जात होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांना करावा लागत होता. तसंच पुलावरील गर्दीमुळे अनेकांना गाडीही चुकत होती. ही ट्रेन पूर्वीप्रमाणे 1 वरुन सोडावी यासाठी मासिक पास धारक प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे वारंवार पाठपुरावाही केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आज प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली.
सकाळच्या वेळी मासिक पासधारकांनी डेक्कन क्वीन ट्रेन रोखून धरल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळी 7.15 वाजता सुटणारी डेक्कन क्वीन तासाभरानंतर सोडण्यात आली. रविवारच्या सुट्टीनंतर मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आज गैरसोय झाली.