मुंबई : वाढत्या डिझेलच्या किंमतीमुळे खासगी बस चालक दिवाळीच्या हंगामासाठी तिकीट दर वाढवण्यास सज्ज झाले आहेत. 25 तारखेपासूनच हे वाढलेले दर प्रवाशांकडून लुटण्यास सुरू होणार असून, याचा फुकटचा ताप प्रवाशांना होत आहे.
सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे डिझेलने शंभरी ओलांडली आहे. विविध राज्यात दर वेगवेगळे असून ते शंभर रुपये प्रति लिटरपेक्षा अधिकच आहेत. दिवाळीनिमित्त मुंबई-पुण्यातून अन्य शहरांकडे जाणाऱ्या गाड्या फुल भरून जातात. मात्र यंदा प्रवाशांना तिकिटांचे दर परवडत नसल्याने काउंटरवर चौकशी करून ते परतत आहेत. दुसरीकडे ट्रेन तिकीट मिळत नसल्याने महागाईच्या विचित्र कात्रीत प्रवासी अडकले आहेत.
डिझेल दरवाढीसोबत, शहरातून जाताना या लक्झरी बस भरून जातात. मात्र येताना पूर्ण आरक्षण नसल्याने हे नुकसान खासगी वाहतूकदारांना सहन करावे लागते. यामुळे नाईलाजास्तव दर वाढ करावी लागत आहे, असे खासगी बस संघटनांचे मत आहे. तसेच 30 ऑक्टोबरनंतर प्रवास आरक्षण करणाऱ्याकडून सुधारित दराने तिकीट आकारणी होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांचे जुने आणि नवे दरपत्रक :
मार्ग - सध्याचे दर शयनयान/बैठे प्रस्तावित दर शयनयान/बैठे
बंगळुरू 1800/1300 2100/1500
मंगळुरू 2200/1400 3000/1800
हैदराबाद 1200/1000 2000/1200
गोवा 900/1200 1500/1800
कोल्हापूर 900/600 1100/1200
राजकोट 800/1000 1800/1500
अहमदाबाद 600/1000 1000/1200
इंदोर 1500/1000 2000-1500
बस मालकांनी भाव वाढवल्याने बुकिंग काउंटरवर चालवणाऱ्यानी देखील आपला नफा बघून वाढ केली आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रमाणेच राज्यांतर्गत ज्या बसेस कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा भागात जाणार आहेत त्यांच्या दरांमध्ये देखील 30 ते 50 टक्के वाढ करण्यात येणार आहे. आधीच सर्वत्र महागाई असल्याने गरीब मध्यम वर्गीय नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
दरवर्षी दिवाळीमध्ये बसच्या तिकिटांमध्ये भाववाढ केली जाते. मात्र यावर सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.