हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये परिवहन महामंडळाच्या बसची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याचा प्रत्यय आला आहे तो म्हणजे, आज सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) झालेल्या एका फोटोमुळे. हा फोटो परभणी ते हिंगोली धावणाऱ्या बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा आहे. कारण या एसटी बस (ST Bus) च्या टप वरून बसमध्ये पाणी गळत होते आणि त्यामधून स्वतःचा मुलगा भिजू नये यासाठी एका प्रवाशाने स्वतःच्या लेकराला जवळ घेत डोक्यावर छत्री घेत बस मधून प्रवास केला आहे
खरं म्हणजे परिवहन महामंडळाच्या बसची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बसची चाकं थांबलेली होती. त्यामध्ये कसाबशा पद्धतीनं काहीच दिवसांपूर्वी बस सेवा पूर्ववत झाली. परंतु बहुतांश बसच्या टपावरुन पाणी लिकेज होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
हिंगोली बस डेपो मधील एकूण 58 बसच्या टपावरुन पाणी लिकेज होत आहे. परिणामी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पाणी पडत असल्यानं प्रवास कसा करायचा? हाच प्रश्न प्रवाशांच्या समोर उभा आहे आणि या संपूर्ण घटनेची साक्ष देणारा फोटो हा आज समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटो संदर्भात अधिक माहिती घेतली असता. ही बस परभणीहून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या बसमध्ये बसलेले हे प्रवासीसुद्धा हिंगोलीच्या दिशेने प्रवास करत होते. परंतु अचानक बसच्या टपावरून पाणी लिकेज होत असल्यानं पर्याय म्हणून त्यांनी छत्रीचा वापर केला. बस मधील सर्व सिट्स ओल्या झालेल्या होत्या. बस मधील बहुतांश भाग पाण्यानं भिजलेला होता. बसमध्ये कुठे आणि कसे बसावे हेही कळत नव्हतं. परंतु अज्ञात व्यक्तीने काढलेले हा फोटो परिवहन विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर मांडणारा ठरला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा फोटो काढून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
हिंगोली आगारातील अनेक बसला बसला वेदर स्ट्रीप लावून पावसाचे पाणी थोपवण्याचा आगाराचा प्रयत्न सुद्धा दिसून आला. याविषयी आगार प्रमुखांना विचारणा केली असता बहुतांश बसेसला वेदर स्ट्रीप बसवण्यात आल्या आहेत. तसेच, बस गळत असल्याचे दिसताच दुरुस्त केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या अनुषंगाने हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की, भारतीय नागरिकांच्या प्रवासासाठी सुसज्ज आणि प्रवासाला सुखकर सेवा देणारी परिवहन विभागाची बससेवा तोकड्या स्वरूपाची असल्याचं या फोटोमधून दिसून आलेले आहे.
यासंदर्भात प्रवाशांना विचारणा केली असता, पर्याय नसल्यानं आम्हाला गळक्या बसमधून प्रवास करावा लागतोय. आमच्याकडे प्रवासाला बस व्यतिरिक्त कोणतेही वाहन नाही, अशी माहिती प्रवाशांनी दिली.
अनेक बसचे दुरुस्तीचे कामे कमकुवत स्वरूपाचे होत असल्याने अनेक बस रस्त्यातच बंद सुद्धा पडत आहे. त्यामुळे प्रवाशांना पावसात बस मध्येच थांबावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था आगाराच्या वतीने लवकर करण्यात येत नसल्याने दोन-दोन तास प्रवाशांना अडकून बसावे लागत आहे. विशेष म्हणजे बस वारंवार बिघडत असल्याने प्रवाशांना सुद्धा वेळेवर प्रवासाच्या ठिकाणी पोहचता येत नाहीये. त्यामुळे परिवहन विभाग या संपूर्ण बस दुरुस्त करून किंवा या बसा ऐवजी नवीन बस खरेदी करून सेवा प्रदान करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरले आहे.