मुंबईः अल्पवयीन मुलांना आता 100 सीसींपेक्षा कमी क्षमतेच्या ‘नॉन गियर’ दुचाकी चालवण्याची परवानगी मिळणार आहे. यासंबंधी मोटार वाहन कायद्यात काही नव्या तरतुदी केल्या जाणार असून त्यात 16 ते 18 वयोगटातल्या मुलांना 100 सीसीपर्यंतच्या नॉन गियर दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
यासंदर्भात प्रत्येक राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही नुकतीच चर्चा करण्यात आली. यावर कॅबिनेटकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या 16 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना 50 सीसीपेक्षा कमी क्षमतेची नॉन गियर दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो.
सध्या 50 सीसी क्षमतेच्या दुचाकींचं उत्पादन जवळपास बंद झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीचा वापर करता यावा, यासाठी 50 सीसी क्षमतेची अट शिथिल करण्याचा विचार सुरू आहे.
केंद्राची सर्व राज्यांच्या परिवहनमंत्र्यांसोबत बैठक
वाहतूक कायद्यांतील बदलांसंदर्भात प्रत्येक राज्यातील परिवहन मंत्र्यांना 21 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. बैठकीला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावतेही उपस्थित होते.
जास्त सीसी क्षमतेची दुचाकी वेगाने धावू शकते. त्यामुळेच जास्तीत जास्त सीसी क्षमतेच्या दुचाकी घेण्याकडे तरुणांचा कल असतो. सध्या कमी क्षमतेच्या दुचाकी अस्तित्वात नसून त्यांचे उत्पादन जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे 16 ते 18 वयापर्यंतच्या मुलांना जास्त सीसी क्षमतेच्या दुचाकी चालवू देण्याची शिफारस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली आहे.