राज्यात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना
मुंबई : राज्यात तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यामाध्यमातून तृतीयपंथी नागरिकांचे कल्याण करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत दिली. यासंबंधी बडोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या दालनात पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.


"तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर हा समाजातील दुर्लक्षित घटक असून त्यांच्याप्रती असलेल्या गैरसमजातून त्यांना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे उद्विग्न अवस्थेत जीवन कंठणारा हा घटक कायम विकासाच्या प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे समाजिक घटकांचे पालकत्व स्विकारलेल्या शासनाने तृतीयपंथी घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणाऱ्या तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या कल्याण मंडळामुळे येत्या काळात तृतीयपंथी नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," असा विश्वास बडोले यांनी यावेळी व्यक्त केला.

"तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. या योजनेंतर्गत वार्षिक 48 हजार ते 60 हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. सुशिक्षित तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून कौशल्यविकासाच्या योजना राबवल्या जातील. अशा भक्कम उपाययोजना राबवल्यामुळे तृतीयपंथी घटकाला जगण्यासाठी समाजापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही," असेही बडोले यावेळी म्हणाले.

बडोले म्हणाले की, "समाजात सन्मानाने वास्तव्य करता यावे यासाठी तृतीयपंथीय घटकांकरीता आवास योजना राबवण्यात येईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी आणि उपचारांसाठी कॅम्प राबवण्यात येतील त्यामुळे स्वतःच्या आरोग्यविषयक असलेल्या उदासीनतेपासून तृतीयपंथीयांना परावृत्त करता येईल, याशिवाय व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही राबवण्यात येतील.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील विख्यात एक व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेच्या प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असणार आहे. याशिवाय विविध 14 विभागांचे सह सचिव/ उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य, आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, असे बडोले यांनी यावेळी स्पष्ट केले.