चंद्रपूर : राज्याच्या काही प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आलेल्या आहेत. पण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीने चंद्रपुरकरांत नाराजीचा सूर उमटला आहे. चंद्रपूरच्या राजकीय-सामाजिक-वैद्यकीय वर्तुळात याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.


मार्च महिन्यापासून जगभरात कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाच्या काळात प्रशासकीय आणि आरोग्य वर्तुळातील उत्तम सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा असे नाव देत गौरविले जात आहे. त्यामळेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा कौतुक केलं. त्यांच्या योग्य नियोजनामुळे चंद्रपूर जिल्ह्याला 2 मे पर्यंत कोरोनाची लागण झाली नाही.


चंद्रपूरचे जिल्हाधिकारी स्वतः वैद्यकीय पदवीधर आहेत त्यामुळे त्यांनी सक्षम पणे प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा हाताळत संसर्ग रोखून धरला असं मानलं जातं. मात्र संकट काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या डॉ. कुणाल खेमनार यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई येथून जलस्वराज्य प्रकल्पाचे संचालक अजय गुल्हाने यांना पाठविण्यात येत आहे. चंद्रपुरात झालेल्या या बदलाचे नकारात्मक सूर उमटले आहेत. एकीकडे भाजपने या कृतीचा कडाडून विरोध केला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. खेमणार यांच्या बदलीला 'अंधेरी नगरी..चौपट राजा' असे संबोधले आहे.


कोरोनाच्या काळात डॉ. खेमणार धीराने तोंड देत असतानाच डॉ. खेमणार यांनी प्रशासनात देखील अतिशय चोख कारभार केला. आणि त्यांच्या हाच चोख कारभार कदाचित संघर्षाचे कारण ठरले. चंद्रपुरातील वैद्यकीय वर्तुळानेही झपाट्याने काम करणाऱ्या डॉ. खेमनार यांच्या बदलीचा विरोध केला आहे. सामान्य चंद्रपूरकरांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून धरणारे डॉ.खेमनार यांची अचानक बदली झाल्याने कोरोना लढ्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती बोलून दाखविली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क आंदोलन केले आणि डॉक्टर खेमनार यांची बदली तातडीने रद्द करा अशी मागणी लावून धरली.


डॉ. कुणाल खेमणार यांना अजून कुठेही पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बदली फक्त फक्त एक प्रशासनिक बाब आहे की सत्ताधाऱ्यांसोबत "जुळवून" न घेतल्याची शिक्षा या बाबत लोकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.