Supriya Sule : दौंड रेल्वे स्थानकावर 36 रेल्वे गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे यातील काही गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली आहे. थांबे नसल्याने परिणामी प्रवाशांना पुण्याला जावं लागतं, असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


सुप्रिया सुळेंचं ट्विट


पुणे आणि मुंबई येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतातून पुण्याकडे जाणाऱ्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा किमान 36 रेल्वे गाड्या दौंड स्थानकावर थांबत नसल्यामुळे दौंडसह या परिसरातील प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. वास्तविक या गाड्यांना दौंड येथे थांबा देणे आवश्यक आहे.शिर्डी येथून अहमदनगरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना देखील दौंड हे स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय बारामती, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, फलटण, रांजणगाव, शिरवळ या परिसरात जाण्यासाठी वाहतूकीच्या सुविधा उपलब्ध आहेत.परंतू आत्ता दौंड रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाड्यांमध्ये पुण्यातून चढावे लागत आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी दौंड स्टेशनवर या सर्व गाड्या थांबणे खुप महत्त्वाचे आणि सोयीचे आहे.याशिवाय दौंड स्थानकावर या गाड्यांना थांबा दिल्याने पुणे स्थानकावरील प्रवाशांचा बोजा बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. रेल्वेमंत्री मा. आश्विनीजी वैष्णव आपणास विनंती आहे की कृपया दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना दौंड येथे थांबा देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असं त्यांनी ट्विटमध्य़े लिहिलं आहे.


'वंदे भारत'लाही दौंडमध्ये थांबा द्या...


यापूर्वी त्यांनी वंदे भारत ट्रेनला दौंडमध्य़े थांबा देण्याची मागणी केली होती. 'मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेसची सगळ्यांनाच आतुरता आहे. मात्र या मार्गावर असणाऱ्या दौंड या महत्वाच्या स्थानकावर थांबा न दिल्याने दौंडला थांबा द्या', अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली होती. दौंड हे या मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसचा थांबा दौंडमध्ये देण्यात यावा, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. मुंबईहून निघणारी ही एक्सप्रेस दादर, कल्याणहून थेट पुण्यात येणार आहे. मात्र या दरम्यानच्या महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा स्थानकावर या गाडीचा थांबाच नाही. त्यामुळे मुंबईहून किंवा सोलापूरहून लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांना मात्र पुण्यातच उतरुन पुढचा प्रवास करावा लागणार आहे.