कोल्हापूर : पुरामुळे तब्बल आठवडभर बंद असलेल्या पुणे-बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाली आहे. शिरोली फाटा परिसरात पाण्याची पातळी कमी होत असल्याने ट्रकची वाहतूक सुरु करण्यात आली. कराड ते कोल्हापूर या मार्गावर अडकलेले हजारो ट्रक पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर वाहनातून दुसऱ्या बाजूला जाता यावं, यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे.


पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे आठवड्यापासून बंद असल्यामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट या दरम्यान किमान 35  हजार वाहनं सात दिवसापासून अडकून पडली होती. रविवारी (11 ऑगस्ट) रात्री थोडं पाणी कमी झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देत काही टँकर सोडण्यात आले. दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. अखेर आज पाणी कमी होत असल्याने ट्रक सोडण्यात आले.

मुसळधार पाऊस आणि पंचगंगा-कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोल्हापूर-सांगलीत पूर आला. पुराचं पाणी महामार्गावर आल्याने कोल्हापुरातील अनेक रस्ते, महामार्ग हे पाण्याखाली गेले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दिशेने सांगली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे 5 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुन या मार्गावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे-बंगळुरु हा महामार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 40 वर पोहोचल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी (11 ऑगस्ट) दिली. तसंच पुराच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत असल्याचं त्यांनी सांगितलं.