मुंबई : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीतल्या मशींदीमध्ये नमाजपठणासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही आज बकरी ईद साजरी केली जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पूरस्थितीमुळे ईदवर केला जाणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

आजच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाचे बळी देऊन आणि मोठी दावत ठेऊन हा 'कुर्बाणी सण' मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता यंदाच्या कुर्बाणीत काटकसर करून या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा नेक निर्णय मुंबईतल्या अनेक मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.

एका बोकडाची किंमत 15 ते 20 हजारांच्या घरात असते. त्याची कुर्बाणी देऊन मोठ्या दावती ठेवल्या जातात. यावर लाखोंचा खर्च केला जातो. मात्र त्याऐवजी काटकसर करुन आम्ही एका पूरग्रस्त कुटुंबियाची जरी मदत करु शकलो तर खऱ्या अर्थाने आम्ही मानवतेच्या धर्माचं पालन करु, अशी भावना अनेक मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली.

साताऱ्यातील मुस्लीम बांधव संपूर्ण पूरग्रस्त गाव दत्तक घेणार
महापुराने कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी, पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. त्यामध्ये मुस्लीम बांधवही मागे राहीले नाहीत. सातारा जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांच्या बैठकीत पुरात मोठं नुकसान झालेलं एक संपूर्ण गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर बांधून देण्यापासून ते कपडे आणि जेवणाचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय साताऱ्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. दरम्यान, सांगलीतील मिरजेत बकरी ईद साध्या पद्धतीने नमाज अदा करुन, एकाही बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे.