रायगडमध्ये धबधब्यांवर जमावबंदीचा आदेश, पर्यटकांचा हिरमोड
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2016 02:59 AM (IST)
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या धबधब्यांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहाला निर्बंध घालण्यासाठीच प्रशासनातर्फे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खालापूर परिसरातल्या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसात कर्जत आणि खालापूर भागात 7 पर्यटकांना धबधब्याखाली पाय घसल्यानं जीव गमवावा लागला आहे. सेल्फी किंवा फोटो काढण्याचा नाद अनेकांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. अतिउत्साही पर्यटकांच्या अघोरी धाडसामुळे प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं म्हटलं जात आहे. या जमावबंदीच्या निर्णयामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला आहे.