धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषापुढे एसटी प्रशासनाची मान्यता असलेली एसटी कामगार संघटना झुकली आहे. कामगार करारावर पुन्हा चर्चा करायला संघटना तयार झाली आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीचा मुंबईतील आक्रोश मोर्चा रद्द करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.


वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या आपल्या कुटुंबासह आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एसटी प्रशासनाच्या मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटाघाटीसाठी उद्या (8 फेब्रुवारी) कामगार करार 2016-20 यावर चर्चेसाठी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे.

एसटी प्रशासन आणि संघटना यांच्यात होत असलेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघून, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी कर्मचाऱ्याला मिळेल, अशी आशा तमाम एसटी कर्मचाऱ्यांना लागून आहे. उद्या होत असलेल्या या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राज्यातील सव्वा लाख एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीवर ठाम राहून ऑक्टोबर महिन्यात चार दिवस संप करुन संघटनांनी काय साध्य केलं? असा  प्रश्नही एसटी कर्मचारी खाजगीत उपस्थित करत आहेत.

संपात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय संप कालावधीत एसटीचे बुडालेलं उत्पन्न भरुन काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होत आहे. या सर्व प्रकारामुळे एसटी कर्मचारी वेठीस धरला गेला. संघटनांच्या राजकरणामुळे कर्मचाऱ्याच्या पदरी शेवटी निराशाच आली. हीच धारणा एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ संदर्भात असलेला प्रश्न न्यायप्रविष्ट असला, तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना काही अंशी खुश करण्याचा केलेला हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.