Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत उद्या घाटकोपरमध्ये विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव नाही. त्यामुळं या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवार यांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळें अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित नसतील असे सांगण्यात येत आहे. 


'ध्येय राष्ट्रवादीचे...मुंबई विकासाचे'...या शिर्षकाखाली शिबिर


उद्या (21 एप्रिल) घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर 2023 होणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 'ध्येय राष्ट्रवादीचे...मुंबई विकासाचे'...या शिर्षकाखाली हे शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराला खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणणार आहेत. तसेच हे नेते मार्गदर्शनही करणार आहेत. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत अजित पवार यांचे नाव नसल्यामुळं विविध चर्चा सुरु आहेत. 


राष्ट्रावदीचे 2 हजाराहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार


या शिबिरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रावदी काँग्रेस पक्षाचे 2 हजाराहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटनात्मक पुनर्रचना तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची करावयाची तयारी हे या शिबाराचे मुद्दे असतील. तसेच सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिलांची असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अपमान, वोट बँक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रुप दडवणे, नागरी सुविधेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणे अशा विविध मुद्यांवर कार्यकर्ता शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. 


दरम्यान, उद्या होणाऱ्या राष्ट्रावदीच्या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कार्यक्रम पत्रिकेत अजित पवार यांचे नाव नसल्यामुळं हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अजित पवार यांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजीत कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहे. त्यामुळं अजित पवार उद्याच्या शिबिराला नसतील असंही सांगण्यात येत आहे.