Tomato Price : बाजारात आवक घटल्याने गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाला महागला आहे. दरम्यान मे आणि जुन महिन्यात उन्हामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यात अचानक पाणी आटल्याने अनेक पिके पाण्याअभावी जळाली. आता पाऊस सुरु झाल्याने देखील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातही टोमॅटो (Tomato) पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत किलोमागे 40 रुपयांची वाढ झाल्याने शहरात टोमॅटो प्रतिकिलो 140 रुपये दराने विक्री होत आहेत. हा उच्चांक असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.


मान्सून लांबला तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कधी रिपरीप तर कधी जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले. याचा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात टोमॅटोचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलैच्या पहिल्या तारखेला टोमॅटो प्रतिकिलो शंभर रुपये किलो होते. त्यानंतर किलोमागे रोज 10 रुपये वाढत असल्याने चार दिवसांत टोमॅटो 140 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या भाज्यांमधून टोमॅटो गायब झाला आहे.


विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील टोमॅटोचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या वर्षीही टोमॅटोचे दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचले होते. यंदा मात्र, त्याने उच्चांक गाठल्याचे भाजी विक्रेते यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जाधववाडी बाजार समितीत बुधवारी टोमॅटोची 67 क्विटल आवक झाली, प्रतिक्विटल 11 हजार रुपयांचा भाव मिळाला, असे घाऊक विक्रेते यांनी सांगितले. 


नांदेड जिल्ह्यात आंध्र प्रदेशातून टोमॅटोची आवक 


दोन महिन्यांपूर्वी ज्या टोमॅटोला भाव मिळत नाही म्हणून लाल चिखल करावा लागला, तोच टोमॅटो आज नांदेड जिल्ह्यात 125 रुपये किलो दराने बाजारात विकल्या जातोय. पण, शेतकऱ्यांकडे टोमॅटोचा नाही.  त्यामुळे आंध्र प्रदेशातून टोमॅटोची आवक होत आहे. ठोक बाजारपेठेत 20 किलोच्या कॅरेटचा भाव 2400 रुपये निघाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत 150 रुपये किलोपर्यंत टोमॅटोचे भाव पोहोचले आहेत. विशेष म्हणजे स्थानिकचा माल कुठेच नसल्याचे व्यापारी सांगतायत. 


शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो फेकून दिले... 


मे महिन्यात शेतकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात टोमॅटो निघत होता. मात्र टोमॅटोला दर मिळत नव्हता. नाशिक जिल्ह्यात अवघ्या 1 ते 3 रुपयांचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो फेकून दिले होते. नाशिकच्या शरद पवार मार्केटच्या गेटवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. तसेच काही ठिकाणी जनावरे शेतात सोडली होती. मात्र आता त्याच टोमॅटोला 140 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: