मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारनं दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा हायवेची दूरवस्था पाहता कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर 2 ते 4 सप्टेंबरपर्यंत टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं (MSRDC ) घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यात आज या विषयावर बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळविण्यासाठी नजीकच्या वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयातून काही दिवस आधी पास घ्यावे लागणार आहेत. या पासशिवाय टोल नाक्यावर सूट मिळणार नाही.
संबंधित वाहन चालकांना आपल्या गाडीचा क्रमांक, स्थानिक पत्ता यांचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या घराचा पत्ताही द्यावा लागणार आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पास धारकांनाच मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल सूट मिळणार आहे.
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांकडून टोल वसुली करु नये: नितेश राणे
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे लोक पनवेल– पुणे– सातारा– कोल्हापूर मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर टोल माफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.