पंढरपूर : पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी यापुढं अनेक तास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण मंदिर समितीनं तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात दर्शनासाठी टोकन पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी ही माहिती दिली.


विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाला सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपूरला येतात. त्यांना सुलभ दर्शन घडावं म्हणून सुरु होणाऱ्या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. समिती अथवा भाविकांना याची आर्थिक झळ बसणार नाही.

भाविकाला दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास मोकळा राहणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे ५० भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात. मंदिर परिसरात टोकन देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेपासून ही टोकन पद्धत सुरु होणार आहे.