मुंबई : संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशी मागणी करणारी एक याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसेच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा महाराष्ट्रातील चौथा दिवस असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सामिल होणार आहेत. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी


संजय राऊत यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे. ऑगस्ट 2022 रोजी संजय राऊतांना त्यांच्या निवास्थानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 102 दिवसांनी संजय राऊतांना पीएमएलए कोर्टाने जामिन मंजूर केला आहे.


राहुल गांधीच्या महाराष्ट्रातल्या पदयात्रेचा आज चौथा दिवस


राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील. दुपारी 4 वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभाग पद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. या प्रकरणाची सुनावणी आज नवे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर 21 व्या क्रमांकावर होणार आहे.


भारत- इंग्लंड सेमिफायनल सामना  


टी 20 विश्व चषकातला आज दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इग्लंड दरम्यान होणार आहे. आज जर भारत जिंकला तर विश्व चषकाच्या अंतिम फेरीत भारत पोहोचणार असून त्याचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.