मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


कानपूर हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, संपत्ती उद्ध्वस्त करणार
कानपूरमधील हिंसा करणाऱ्यांवर योगी सरकारनं कडक पाऊल उचललं आहे. आरोपींवर गँगस्टर अॅक्ट लागणार आहे. तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त करण्यात येणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. काल कानपूरमध्ये जुम्म्याच्या नमाजानंतर दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींना अटक केली आहे. भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन हा वाद सुरु झाला. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे की या आरोपींवर गँगस्टरचा अँक्ट लागेल, तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त केली जाईल. महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनास्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर कार्यक्रमासाठी आले असताना हा हिंसाचार घडला आहे.  


पुण्यात साखर परिषद, मुख्यमंत्री तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित राहणार
पुण्यात आज साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे 4 आणि 5 जूनला साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. साखर उद्योगासमोरील समस्या आणि भविष्यातील बदल या अनुषंगाने या साखर परिषदेत वेगवगेळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर शरद पवार यांचे ‘साखर उद्योगासाठी योगदान’ या पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.


पुणतांब्यात कृषी मंत्री आज आंदोलकांच्या भेटीला
आज पुणतांब्यातील आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आज आजी-माजी कृषीमंत्री आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत. कृषीमंत्री दादा भुसे पुणतांब्यात सकाळी 10 वाजता आंदोलकांची भेट घेणार आहेत. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आंदोलकांची भेट घेणार सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत.
 
शरद पवार आणि संजय राऊत यांची मुलाखत
पुण्यात कनेक्ट महाराष्ट्र कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव  मुलाखत घेणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमातील वेगवगेळ्या सत्रांमधे जितेंद्र आव्हाड, कन्हैया कुमार, प्रवीण गायकवाड आणि सचिन सावंत बोलणार आहेत. रोहित पवार यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी विचारधारेबाबत विरोधकांकडून माध्यमं आणि समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 
 
आयफा अवॉर्डचा ग्रॅंड फिनाले
आयफा अवॉर्ड 2022 चा ग्रँड फिनाले आज अबुधाबी या ठिकाणी होणार आहे. यावेळी सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल सूत्रसंचालन करणार आहेत. बॉलिवूडचे अनेक सितारे यावेळी उपस्थित राहतील.