Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.. संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला. 


 मुख्यमंत्र्यांसोबत मविआ प्रमुख नेत्यामची बैठक झाली. आम्ही निवडणूक स्वीकारली आहे. आमचं बळ दाखवण्याची आम्हाला पून्हा एकदा संधी मिळाली आहे. आम्हाला बळ दाखवायचं नव्हतं,  पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. याचा  त्यांना पश्चाताप होणार आहे. मविआचे चारही उमेदवार निवडून येतील. कोणीही शहाणपणा करू नये. निवडणूकीत अजिबात घोडेबाजार होणार नाही. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 


केंद्रीय एजन्सी दबाव टाकते पण आम्हीच जिंकणार आहोत.  संजय पवार पहिल्या फेरीत निवडून येतील. या निकालानंतर विरोधकांना पश्चाताप होईल. अजिबात घोडेबाजार होणार नाही ज्याला करायचा त्यांनी घोडेबाजार करावा. विरोधकांनी राज्यसभा निवडणूक लादली. पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात बोलायची गरज नाही. जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यसभेची सहावी जागा भाजपा जिंकणार आहे. आमदारांच्या सदसदविवेक बुध्दीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडीने सहावा उमेदवार देवून घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 


मविआची भाजपला काय ऑफर दिली होती?
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधान परिषदेसाठी 10 जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपच्या चार जागा निश्चित समजल्या जात आहेत. मविआकडून भाजपला पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 


संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13  च्या आसपास मतांची आवश्यकता आहे.