मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज्यपाल विशेष अधिवेशन कधी बोलवणार?


 अविश्वासदर्शक ठरावाबाबत भाजपनं दोन दिवसांपूर्वी  राज्यपालांना ईमेलद्वारे पत्र पाठवलंय. त्यानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करावं अशी मागणी भाजपनं केली आहे. यावर राज्यपाल आज काय निर्णय घेणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे अशी चर्चा राज्यपालांच्या भेटीदरम्यान झाली आहे. 
 
राज्यपालांकडून विधिमंडळ सचिवांना लिहिलेलं पत्र व्हायरल..पत्र खोटं असल्याची माहिती


30 जूनला बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत राज्यपालांचं पत्र रात्री खूप व्हायरल झालं. या पत्रावर 29 तारीख असल्यानं ते पत्र 28 तारखेच्या रात्रीच कसं समोर आलं याविषयी शंका आहे. त्यानंतर राजभवनाकडून हे पत्र खोटं असल्याचं सांगण्यात आलं. 
 
बंडखोर आमदार आज राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार..सूत्रांची माहिती


 रात्रभर चर्चा करून आज सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत राज्यपालांना पत्र देऊन सरकारचा पाठिंबा काढला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. पत्राचा मायना आणि काय लिहिण्यात यावे यावरही रात्री बंडखोर आमदारांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. हे पत्र थेट ईमेलवर पाठवण्यात येईल अशीही शक्यता आहे.  


भाजपच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या मागणीनंतर महाविकास आघाडी सरकार न्यायालयात जाणार


आज सरकारकडून कोर्टात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या मागणीच्या पत्रानंतर महाविकास आघाडी आज याच्याविरोधात न्यायालयात जाणार अशी माहिती आहे. मागच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाकडे मुभा मागण्यात आली होती. जर विरोधकांनी बहुमताची मागणी केली तर आम्ही न्यायालयात येऊ असं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यावर तुम्ही या, आम्ही सुनावणीला तयार आहोत असं न्यायालयानं म्हटलं होतं. 
 
आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर आमदारांची बैठक


रात्री मातोश्रीवर उरलेल्या आमदारांची बैठक झाली. या आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. पुढचे तीन -चार  दिवस महत्वाचे असल्याने ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलंय. आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या आमदारांची बैठक होणार आहे. 


आजही होणार मंत्रीमंडळ बैठक..औरंगाबादच्या नामांतरणाचा निर्णय येणार?


कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. कालच्या बैठकीत औरंगाबादचं नाव संभाजी नगर कारावं अशी मागणी अनिल परबांनी केली. आजही मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत यावर निर्णय येऊ शकतो. 


उदयपूरमध्ये तालिबान..नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्याची निर्घृण हत्या


उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनाचं स्टेटस ठेवणाऱ्या टेलरची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. आरोपींकडून या घटनेचा व्हीडीओ बनवून व्हायरल करण्यात आलाय. या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या भयानक घटनेनंतर उदयपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी दगडफेकीच्या, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राज्यभर अलर्टही जारी करण्यात आलाय.  


 किरीट सोमय्या  पर्यावरण मंत्रालयाविरोधात तक्रार दाखल करणार 
 
 किरीट सोमय्या मरीन लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण मंत्रालयाविरोधात तक्रार दाखल करणार आहे.  
 
 राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल आज शेवटचा दिवस


 राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांनी 24 तारखेला नामांकन दाखल केलंय. तर, विरोधी पक्षांकडून 27 जूनला यशवंत सिन्हा यांनी नामांकन अर्ज भरलाय. 18 जुलैला मतदान होणार आहे, तर 21 जुलैला मतमोजणी होईल.