मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
महाविकास आघाडी सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो. राज्यपाल स्वतः उपसभापतींना ठराविक मर्यादेत बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देऊ शकतात. महाविकास आघाडीला सध्या सर्वाधिक 116 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शिंदे गटाचे आमदार मतदानाला गैरहजर राहिले तरी भाजपकडे 128 आमदारांचा पाठिंबा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने ठाकरे सरकारचा पराभव निश्चित झाल्याचे भाजपच्या सूत्रांचे मत आहे.
गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूचे बुकिंग 5 जुलै पर्यंत वाढ
गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूचे बुकिंग 30 ते 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. गरज भासल्यास बुकिंगची तारीख आणखी वाढवण्यात येईल.
भाजपच्या आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना
भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत राहण्यास सांगितले असून, येत्या एक-दोन दिवसांत रणनीती ठरवली जाईल.
संजय राऊत यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज ईडीसोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. परंतु, संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. ईडीने आज सकाळी 11 वाजता संजय राऊत यांना हजर होण्यास सांगितले आहे. मात्र, संजय राऊत यांनी सांगितले की, अलिबागला जाण्यासाठी मीटिंग असल्याने मंगळवारी आपण ईडीसमोर जाऊ शकत नाही. त्यामुळे ईडीकडून संजय राऊत हे दुसरी वेळ मागून घेऊ शकतात.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आंदोलनं, सभा, बैठका
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविथ समर्थन रॅली काढण्यात येत आहेत. काल कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे एका शिवसैनिकाला राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.
आम्ही सध्यातरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत, भाजपच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तासंघर्षाचा फायदा उचलून भाजप(BJP) बंडखोर आमदारांसोबत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरु असताना याबाबत भाजपच्या कोअर कमिटीत नेमका काय निर्णय झाला, याबद्दल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सध्यातरी वेट अँड वॉच या भूमिकेत असून अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
आजपासून जीएसटी परिषदेची बैठक
जीएसटी परिषदेची बैठक आजपासून सुरू होत आहे. चंदीगडमध्ये होणाऱ्या बैठकीत काही वस्तूंच्या करातील दर बदलले जाऊ शकतात. याशिवाय, राज्यांना नुकसानभरपाई प्रणाली आणि छोट्या ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये दिलासा, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली GST परिषदेची 47 वी बैठक 28-29 जून रोजी होणार आहे. सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होत आहे.
पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर
UAE- G7 शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते संयुक्त राष्ट्राचे माजी अध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त करतील.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा देशव्यापी प्रचार आजपासून सुरू होणार आहे.
भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना
भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी20 सामना भारताने जिंकल्यानंतर आज दुसरा सामना पार पडणार आहे.
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातचा काही भाग, राजस्थान, मध्य प्रदेशचा उर्वरित भाग आणि उत्तराखंडमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
पुढील 24 तासांत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, कोकण आणि गोवा, गुजरातच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.