मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
संभाजीराजे आज भूमिका स्पष्ट करणार
राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे लढणार की त्यातून माघार घेणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
अविनाश भोसलेंना अटक, दिल्लीला घेऊन जाण्याची शक्यता
पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. येस बॅंककडून लोन मिळून देण्यासाठी भोसले यांनी वाधवन यांच्याकडून कमिशन घेतल्याचा आरोप आहे. दिल्ली सीबीआयची कारवाई. भोसलेंना दिल्लीला घेऊन जाण्याची शक्यता आहे.
प्रश्न महाराष्ट्राचे आज दिवसभर एबीपी माझावर
आज दिवसभर एबीपी माझावर प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरे मंत्री आणि नेते मंडळीची... ज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शालेय शिक्षण, कृषी, गृहनिर्माण, ग्रामविकास, उच्च शिक्षण आणि महसूल खात्याने सत्तेत आल्यानंतर राज्यासाठी कोणते निर्णय घेतले? विरोधी पक्षाने सर्वसामान्यांचे कुठले प्रश्न लावून धरले? की सत्ताधारी आणि विरोधक फक्त आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण करण्यात मश्गुल आहेत. जनतेच्या प्रश्न या सर्वांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे? महागाई, बेरोजगारी, टॅक्स यामध्ये भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आज दिवसभर मिळणार का? पाहा दिवसभर 'प्रश्न महाराष्ट्राचे'
तुकाराम मुंढेंनी बंद केलेली 'ती' फाईल आयुक्त रमेश पवार उघडणार
तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली फाईल विद्यमान आयुक्त रमेश पवार उघडणार आहे. शहरातील सव्वा लाखाहून अधिक मिळकतीवर दंडात्मक करावाई होणार आहे. ज्यांनी मिकळतीमध्ये रचनात्मक बदल केले. अतिक्रमण केले आशा नागरिकांना दंड ठोठावला जाणार आहे. नागरिकांच्या विरोधामुळे मुंढेना फाईल बंद करावी लागली होती तेवढ्यत त्यांची बदली झाली,आता त्या फाईल्स उघडल्या जाणार आहे
देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर 'मराठा क्रांती मोर्चा' ची धडक!
देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर 'मराठा क्रांती मोर्चा' धडकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत 50% च्या आत ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळावे यावर चर्चा होणार आहे.
मान्सून आज केरळमध्ये दाखल होऊ शकतो
मान्सून आज केरळमध्ये दाखल होऊ शकतो. नैऋत्य मॉन्सून आज केरळमध्ये नियोजित वेळेच्या पाच दिवस अगोदर दाखल होऊ शकतो. हवामान खात्याने ही माहिती दिली.केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन साधारणपणे 1 जून रोजी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी मोदी शेतकरी, ड्रोन चालकांशी संवाद साधणार आहेत. 1600 लोक सहभागी होतील. आजपासून दोन दिवसीय 'इंडिया ड्रोन फेस्टिव्हल' सुरू होत आहे.
अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, सीएम गेहलोत यांना पत्र लिहून सर्वेक्षण करण्याच्या मागणी
काशीच्या ज्ञानवापी मशिदीपासून सुरू झालेला मंदिर-मशीद वाद आता राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीतील एका संस्थेने याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये पुरातत्व विभागाकडे दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीएम गेहलोत यांना लिहिलेल्या पत्राची माहिती समोर आल्यानंतर दर्ग्याबाबत वाद सुरू झाला आहे.
उडता गुजरात, 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त
मुंद्रा विमानतळावर पुन्हा एकदा मिठाच्या नावाखाली आणलेले 52 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या कोकेनची किंमत 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले असून, ही खेपही इराणमार्गे गुजरातमधील मुंद्रा विमानतळावर पाठवण्यात आली होती. वर्षभरात महसूल गुप्तचर संचालनालयाने आतापर्यंत 3200 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.
आज इतिहासात :
1964 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन
1957 : भारतीय राजकारणी आणि उद्योजक नितीन गडकरी यांचा जन्म
1935 : रमाबाई आंबेडकर यांचे निधन
1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना
1938 : ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखक, कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिन.