Todays Headline 20th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?


दसरा मेळाव्याआधीच  उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे.  कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.  उद्धव ठाकरे संध्याकाळी 7.30 वाजता नेस्कोच्या मैदानात भाषण करणार आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा कार्यकर्त्यांकडून ते आढावा घेणार आहेत. 


प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टापुढे हजर करणार आहेत. ईडीनं याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दोन्ही आरोपींविरोधात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आहे.


राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर 


 बंदरे व जलमार्ग मंत्री केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे.  लोकसभा प्रवास कार्यक्रमानिमित्त ठाकूर हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या तीन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात ते उमरखेड विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत.


भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज  दुसरा एकदिवसीय सामना


भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज  दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय महिलांनी 7 विकेट्सनी जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. सामना सेंट लॉरेन्स ग्राऊंड, येथे खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.30 ला सुरु होईल.