Hunting turtles Daund : कासव (turtles) भाजून खाण्यासाठी कासवाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात घडला आहे. दौंड (daund) तालुक्यातील वरवंडमध्ये दादा सावंत आणि नाना सावंत या दोन आरोपींनी कासवाची शिकार केली आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती वन खात्याला मिळाली होती. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली.


नक्की काय घडलं?
दादा सावंत आणि नाना सावंत या दोघांना कासव भाजून खायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून कासवाची शिकार करण्याचा कट रचला. त्यानुसार दोघांनी मिळून कासवाला घरी आणले. या सगळ्याची माहिती एका व्यक्तीने वन विभागाला दिली होती. माहिती कळताच वनविभागाचे कर्मचारी या दोघांच्या घरी पोहचले. त्यांच्या घराची झडती घेतली असता कासवाचे तुकडे सापडले आणि घराबाहेर कासवाचे कवचदेखील सापडले. त्यानुसार पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता दोघांनी कासव भाजून खाण्यासाठी कासवाची शिकार केल्याची कबुली दिली. त्यावरून वन खात्याने नाना सावंत आणि दादा सावंत यांच्या विरोधात वन्यजीव अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीना अटक केली आहे. 


आतापर्यंत आपण हरीण, ससा, कबुतर यांची खाण्यासाठी शिकार केल्यांच्या अनेक घटना वाचल्या असतील. मात्र कासवाची शिकार केल्याची घटना फार दुर्मिळ आहे. त्यामुळे गावात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.  विकृतांकडून अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर प्राण्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. 


व्हॅट्सअपवर पाठवला होता घटनेचा व्हिडीओ
खाण्यासाठी कासवाची शिकार केली जात आहे असं कळताच एक व्यक्तीने वनपाल यांना या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ करुन व्हाॅट्सअपवर पाठवला होता. हा व्हिडीओ पाहून वन अधिकारी आणि वनपाल यांनी ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती गोळा केली आणि दौंडमधील कानिफनाथ नगरमधील सावंतांच्या घरी पोहचले. वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिलेल्या सूचनांवरुन ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. शिवाय घराशेजारी आणि घरात कासवाचे तुकडे आढळल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.


प्राणीप्रेमींचं म्हणणं काय?
दौंडमध्ये यापूर्वी अनेकदा प्राण्यातबाबत घटना घडल्या आहेत. मृतावस्थेत वाघ सापडला होता. त्यावेळी परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक प्राणीप्रेमींनी या कामासाठी मदत केली होती. दौंडमध्ये प्राणी प्रेमींची संख्या भरपूर प्रमाणात आहेत. प्राण्याचं रेक्यू करण्यासाठी ते कायम तत्पर असतात मात्र कासवाच्या शिकारीनंतर ते नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे.