मुंबई: भारत जोडो यात्रा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असून यामध्ये आज काँग्रेसच्या महिला खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी सामील होणार आहेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने भारत जोडोमध्ये आज नारी शक्ती दिसून येणार आहे. तसेच मुंबई ते ठाणे या दरम्यानचा कोपरी ब्रिज कामासाठी रात्रीच्या वेळी बंद करण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी जयंतीनिमित्त आज भारत जोडोत काँग्रेसची नारी शक्ती
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी अशी ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज भारत जोडो यात्रेत काँग्रेसची नारी शक्ती सहभागी होणार आहे. भारत जोडो यात्रेला आज गजाननदादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर जलंब या ठिकाणी सकाळी 10 वाजता विश्रांतीसाठी ही यात्रा थांबेल. दुपारी चार वाजता जलंब येथून पुन्हा एकदा पदयात्रेला सुरुवात होणार आहे. आज सायंकाळी शेगावातील भस्तान या ठिकाणी सायंकाळची कॉर्नर सभा होणार आहे आणि त्यानंतर भेंडवळ या ठिकाणी रात्रीची विश्रांती घेण्यात येणार आहे.
आज इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत. महिला भारतयात्री, काँग्रेसच्या महिला खासदार, महिला आमदार, महिला पंचायत समिती सदस्य, महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या या राहुल गांधींसोबत चालणार आहेत.
मराठवाडा विद्यापीठाकडून नितीन गडकरी आणि शरद पवारांना डी.लिट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दिक्षांत समारंभ आहे. या समारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज दिवसभर असणार आहे.
कोपरी ब्रिजच्या कामासाठी रात्री मेगाब्लॉक
ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे. 19 आणि 20 नोव्हेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.