मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन
राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदार सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. . गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहयला मिळणार आहे.
सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं, दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ
भल्या पहाटे दुधाच्या खरेदीनं दिवसाची सुरुवात करण्याऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं असून, या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुधाचे हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
भारतीय फुटबॉल असोसिएशनची मान्यता निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफानं भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्यानं तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफानं स्पष्ट केलंय. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज मुद्दा न्यायालयात मांडला. फीफानं केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक अडचणीत आला आहे