मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
द्रौपदी मुर्मु यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी?
शिवसेनेकडून सातत्यानं महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य पाहायला मिळत आहेत. सुरूवातीला औरंगाबद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मुद्दा घटक पक्षांना विचारात न घेत रेटून नेणे आणि आता परस्पर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणे यामुळे नाराजीत वाढ होत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला आजही कायम राहणार आहे. आज मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीचे आयोजन केलं आहे. त्यानंतर दुपारी राज्यभरातील महिला पदाधिकऱ्यांची बैठक शरद पवार घेणार आहेत
आर्यन खानला परत मिळणार पासपोर्ट?
कॉर्डिलिया क्रुझ पार्टी प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खाननं आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर एनसीबी आज कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
आज गुरूपौर्णिमा
गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा बुधवार 13 जुलै रोजी साजरी होणार आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
13 जुलै 2011 मुंबईत बॉम्बस्फोट
13 जुलै 2011 हा दिवस कोणीही कधीही विसरू शकणार नाही. 13 जुलै 2011 रोजी झवेरी बाजार, ओपेरा हाउस आणि दादर येथे बॉम्बस्फोट झाला आणि हा धमका मुंबईकरांना सुन्न करून गेला. या बॉम्बस्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला.