मुंबई: शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले शिवसैनिक तिथेच आहे, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे."
शरद पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे,
1) सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, असे वक्तव्य केले आहे. ओबीसींना घेऊनच निवडणुका झाल्या पाहीजेत, हा आपला दृष्टीकोन आहे. ओबीसींना बाजूला ठेवून निवडणुका होता कामा नयेत.
2) नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत नेतृत्वाची नवी पिढी तयार करण्याची, तसेच समाजातील सर्व घटकांना आणि तरुणांना संधी कशी देता येईल, याची काळजी घ्या.
3) जिल्हा स्तरावर तरुणांना, लहान घटकांना संधी देण्याचा प्रयत्न करा. पन्नास टक्क्यांच्या आसपास तरुण आणि इतर घटकांना संधी दिल्यास, राज्यात नवीन नेतृत्वाची फळी तयार होईल. त्या माध्यमातून लोकांच्या कामांना न्याय देता येतो.
4) सत्ता विकेंद्रीत झाली पाहीजे. मात्र आज केंद्रातील सरकार सबंध देशातील सत्ता केंद्रीत करत आहे. ही केंद्रीत झालेली सत्ता एक विशिष्ट विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. सत्तेचा गैरवापर करुन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
5) सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत. अनेकजण मला बोलले की, 40 मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल.
6) महाराष्ट्रात महसूल खात्याचे सहा विभाग आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून या विभागांप्रमाणे संघटनेची जबाबदारी काही लोकांकडे द्यावी. ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी आपल्या विभागावर संपूर्ण लक्ष ठेवून काम करावे.