मुंबई : सुकाणू समितीमध्ये आज अंतर्गत चर्चा होणार आहे. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, गिरीधर पाटील यांचा या चर्चेला नकार आहे. त्यामुळे सुकाणू समितीतच मतभेद आहेत का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीतल्या अंतर्गत चर्चेला महत्त्व आले आहे.
सुकाणू समितीत मतभेद?
सुकाणू समितीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि इतर सदस्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि मंत्रिगटासोबतच्या चर्चेची तयारी दाखवली. मात्र, गिरीधर पाटील यांनी त्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता चर्चा होणार की फिसकटणार हे पाहणं महत्वाचं आहे.
उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या समितीचे प्रमुख असतील. तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चाधिकार मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, वीजबिल माफी, दूधाच्या दरांमध्ये वाढ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह इतर मागण्या सुकाणू समितीने लावून धरल्या आहेत आणि त्यासाठी 12 जूनला सरकारी कार्यालयांना घेराव आणि 13 तारखेला रेलरोकोची घोषणा केली आहे.