Baburao Bagul : आज (17 जुलै) ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक बाबुराव बागूल (Baburao Bagul) यांची जयंती आहे. आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणजे बाबुराव बागूल यांच्याकडे बघितले जाते. बाबुराव बागूल यांच्या लेखनामुळं मराठी साहित्यात विद्रोही पर्वाचा प्रारंभ झाला असेही म्हटलं जातं. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं, वेदनांचं वर्णन करणाऱ्या आहेत. 


शालेय वयातच आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव


बाबुराव बागूल यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी झाला होता. नाशिक जिल्ह्यातील 'विहितगाव' नावाच्या एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. दलित समाजात जन्मल्यामुळे जातीय विषमतेचं अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत. तेव्हा ते तरी जगावेत या विचारानं बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपमध्ये राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिलं. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव शालेय वयातच बागुलांच्या मनावर झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले होते. आर्थिक परिस्थितीमुळं मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागलं. 


अण्णा भाऊ साठे यांच्या संपर्कातून कामगार चळवळीत सहभाग


नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपमध्ये राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता याविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. 1955 मध्ये रेल्वे वर्कशॉपमध्ये त्यांना नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळं भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरुन भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरुन असे राहणे न रुचल्यामुळे ते नोकरी सोडून मुंबईत परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी 'जेव्हा मी जात चोरली होती' ही कथा लिहिली.


दलित साहित्यामध्ये मोठं योगदान


विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी, विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारुण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. दलित साहित्यामध्ये मोठं योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं वर्णन करणारे आहेत. स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. सूड कथेमध्ये बाबुराव बागूल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलं आहे. या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित स्त्रीच्या सामाजिक स्थितीचं चित्रण करणार आहे.


नवयुग, युगांतर नियतकालिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध


1957 मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या 'नवयुग' नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात 'नवयुग' व 'युगांतर' या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा 1963 साली 'जेव्हा मी जात चोरली होती' या कथासंग्रहाच्या रुपाने प्रकाशित झाल्या. नंतर 1969 सालात 'मरण स्वस्त होत आहे' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली.


प्रकाशित साहित्य


कादंबरी


अघोरी (1983)
अपूर्वा
कोंडी (2002)
पावशा (1971)
भूमिहीन
मूकनायक
सरदार
सूड


कथासंग्रह


जेव्हा मी जात चोरली होती (१९६३)
मरण स्वस्त होत आहे (१९६९)


कवितासंग्रह


वेदाआधी तू होता


वैचारिक


आंबेडकर भारत
दलित साहित्यः आजचे क्रांतिविज्ञान



पुरस्कार आणि सन्मान


मुंबईतील धारावी इथं 7 फेब्रुवारी 1999 रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बागुल यांनी भुषवलं. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले होतं.
बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार' 2007 साली त्यांना देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार,
जनस्थान पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्माननीत करण्यात आलं.  26 मार्च 2008 रोजी बागुलांचे नाशिकमध्ये निधन झाले.


(सदर माहिती विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून घेण्यात आली आहे.)