15 January In History:  आज म्हणजे 15 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. पानिपतंचे तिसरे युद्ध आज संपुष्टात आले. तर, अमेरिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यांचा जन्म आज झाला. तर, महाकवी नामदेव ढसाळ आणि लोककलावंत विठाबाई नारायण गावकर यांचा आज स्मृतीदिन आहे. आज भारतीय लष्कर दिनदेखील साजरा करण्यात येतो. 



1761: पानिपतचे तिसरे युद्ध संपले


भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे पानिपतचे तिसरे युद्ध आजच्या दिवशी संपले. मराठा साम्राज्यासाठी या युद्धातील अब्दालीकडून झालेला पराभव धक्कादायक होता.  मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. मराठा सरदारांची पिढी या लढाईत मारली गेली. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला असे म्हटले जाते. 


 


1926 : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म (Kashaba Jadhav Birth Anniversary)


भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा आज जन्मदिवस. खाशाबा जाधव यांनी 1948 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले होते. भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. 



1929 : मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यांचा जन्म


अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते, वर्णद्वेषाविरोधी लढ्यात मोलाचे योगदान आणि नेतृत्व करणारे मार्टिन ल्यूथर किंग यांचा आज जन्मदिवस. मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर हे धर्मगुरूदेखील होते. अहिंसक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नागरी अधिकाराची चळवळ उभारली. कृष्णवर्णीयांना मतदान, रोजगार आणि इतर नागरी अधिकारांसाठी त्यांनी मोर्चे काढले. मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यांना नोबेल पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. 


1949: भारतीय लष्कर दिवस (Indian Army Day)


1949 मध्ये जनरल सर फ्रान्सिस बुचर यांनी भारतीय लष्कराचे नियंत्रण फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्याकडे सोपवले. भारताचे अंतिम ब्रिटिश कमांडर फ्रान्सिस बुचर होते. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा होते. आजपासून लष्कराचे संपूर्ण नियंत्रण भारताकडे आले.



2002: विठाबाई नारायणगावकर यांचा स्मृतीदिन


तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा स्मृतीदिन. सुंदरता, सुमधुर आवाज, नृत्य या कौशल्याच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांनी सादर केलेल्या अनेक कलाकृती अजरामर ठरल्या. विठाबाईंना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे. तमाशा, लोककला क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 



2014: महाकवी नामदेव ढसाळ यांचा स्मृतीदिन (Namdeo Dhasal Death Anniversary)


दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे, दलित पँथर चळवळीचे संस्थापक नेते, महाकवी नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतीदिन. नामदेव ढसाळ यांच्या कविता, लेख हे साहित्य विश्वात महत्त्वाचे समजले जातात. नामदेव ढसाळ यांच्या कवितेची विशिष्ट शैली होती. साहित्य आणि चळवळीत ढसाळ अग्रसेर होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली.


इतर घडामोडी:


1559: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.


1889: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी 'द कोका कोला कंपनी' म्हणून प्रसिद्ध आहे.


1921: महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म


1949: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली. 


1956: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा जन्म. 


1996: भारतातील रेल्वे युगाची साक्षीदार आणि  ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.


2001: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.