मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधातल्या याचिकांवर आज ( बुधवारी ) मुंबई उच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या 16 टक्के आरक्षणानंतर मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही मराठा आरक्षणाविरोधात आणि मेगाभरतीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात मेगाभरतीपूर्वी सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करावं. शिवाय राज्यात सध्या तीन लाख कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यात मराठा समाजातील तरुणांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आधी त्यांना सेवेत घ्या, असं या सर्व कंत्राटी तरुणांचं म्हणणं आहे. त्यामुळे या याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. या आरक्षणाला विरोध होणार अशी चर्चा असताना गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल केली. राज्य सरकारने 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाहीर करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. तसेच एखाद्या समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधानाच्या तरतुदींविरोधात असल्याचं सांगत, अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली होती.
सदावर्तेंना पोलीस संरक्षण
मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 10 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाच्या आवारात याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदवर्ते यांच्यावर हल्ला झाला होता. मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल केल्याचा राग मनात धरत जालन्यातील वैजनाथ पाटिल या तरुणाने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सदावर्तेंना पोलीस संरक्षण देण्यात आले.
हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट
मराठा आरक्षणाला विरोध होणार हे आधीच लक्षात आल्याने याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी 30 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात तर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात 3 डिसेंबर रोजी कॅव्हेट दाखल केलं आहे. याचा अर्थ मराठा आरक्षणाविरोधात कोणतीही याचिका दाखल झाल्यास, विनोद पाटील आणि राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्ट कोणताही निर्णय देणार नाही.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल
मराठा आरक्षणाच्या बाजूने अॅड. हरीश साळवे लढणार
मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी करण्यास हायकोर्टाचा नकार
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार
राज्य सरकारच्या मेगाभरतीत मराठा समाजाला 16% आरक्षण
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला
अॅड. सदावर्तेंवर हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटीलला जामीन
मेगाभरतीचा पुनर्विचार करता येईल का? हायकोर्टाची विचारणा