Devendra Fadnavis : शिवसेनेच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा लगावला होता. त्यांच्या या टीकेवर आज फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक आणि सत्ताधारी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना आणि भाजप यांच्यात तर सारखाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्याचबरोबर दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे आरोपसत्र सुरुच आहे. तर त्यांच्या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने  बुस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर फडणवीसांचे ट्वीट


कालच्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला होता. भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही शरसंधान साधलं. बाबरी पाडायला आपण उपस्थित होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यावर ठाकरेंनी टीका केली. त्यावर आज फडणवीसांनी "जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा..." म्हणत पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत,  सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला...आणखी एक  'टोमणे बॉम्ब'... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा". असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: