मुंबई : महाराष्ट्रात पुढच्या 24 तासात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पाऊस पाडणार आहे. मराठवाडा, उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने दिला आहे.
मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात कालही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
दुसरीकडे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
28 मे रोजी मान्सून केरळात : स्कायमेट
मान्सून 28 मे रोजी देवभूमी अर्थात केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे.
मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटने व्यक्त केला होता.
यंदा पाऊसमान कसं असेल?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
लवकरच उकाड्यापासून दिलासा
दरम्यान, पारा 47 अंशांवर पोहोचला आहे. विदर्भातील चंद्रपुरात 47 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. तर मानसूनच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजाचीही लगभग सुरु होणार आहे.