सांगली : पैज लावून कृष्णा नदीत उड्या मारण्याचा खेळ सांगलीतील तीन मित्रांच्या अंगाशी आलाय. सांगलीच्या कृष्णा नदीवरील कसबे डिग्रज बंधाऱ्यावर पार्टी केल्यानंतर कृष्णा नदीपात्रात उड्या मारण्याची पैज लावण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं.


यामध्ये वैभव पांढरे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोन दिवसांनी वैभव पांढरेंचा मृतदेह सापडला. तर किशोर पांढरे आणि राजू पांढरे या दोघांना वाचवण्यात यश आलं.

मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील हरीजन वसाहतीमधील तीन मित्रांनी डिग्रज बंधाऱ्यावर कृष्णा नदीवर पार्टीचा बेत केला. जेवणानंतर बंधाऱ्यावरुन उडी मारण्याची तिघात पैज लागली. यामध्ये तिघांनीही उड्या मारल्या.

पाऊस असल्याने बंधाऱ्यात पाण्याचा वेग जास्त होता. अंदाज न आल्याने वैभव पांढरे वाहून जाऊ लागले. बाकीच्या दोघांनी भीतीने आरडाओरड सुरु केली. नदीकाठावर असलेल्या लोकांनी धाव घेत मदत करत किशोर आणि राजू पांढरे या दोघांना बाहेर काढलं.

वैभव मात्र पाण्यात दिशेनासे झाले. अखेर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला.