हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथे तीन दिवसात तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही घटना वेगवेगळ्या कारणांनी घडल्या आहेत. यापैकी दोन घटनांची नोंद वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांमुळे बोराळा गावावर शोककळा पसरली आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बँकेची कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून बोराळा येथील प्रभाकर जाधव (वय 32 वर्ष) यांनी राहत्या घरी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर दुसर्या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (वय 22 वर्ष) याने 10 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. धमक्यांच्या त्रासाला कंटाळून संतोषने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोषच्या आईच्या फिर्यादीवरुन वसमत ग्रामीण पोलीस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसरी घटना ही 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा घडली आहे. या घटनेत राजू गंगातीरे यांनी गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू यांचा मृतदेह वसमत येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, त्यांचे शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करणारे तीनही तरुण शेतकरी कुटुंबातील आहे.
घटनेची कारणे जरी वेगवेगळी असली तरी एकापाठोपाठ एकाच गावात तीन आत्महत्या होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.