सिंधुदुर्ग : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली व कोट्यावधी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी (whale Fish vomit) स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने सापळा रचून जप्त केली. बांदा बाजारपेठ येथे गोवा येथून आलेल्या तिघांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच कोटी बत्तीस लाख रूपये किमतीच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. काँन्टनटिनो फीलोमीनो फर्नाडिस, जुजु जोस फेरीस, तनिष उदय राऊत अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. 


व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे मुद्देमाल घेऊन बांदा बाजारपेठेत आले होते. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. व्हेल मासा हा संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीचा (अंबरग्रीस) बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.  
     
व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने. व्हेल माशाची उलटी हा पदार्थ स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. या पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफयुम, औषधांमध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य, तसेच खाद्य पदार्थामध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. या पदार्थाची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करोडो रुपयांमध्ये किंमत आहे.
    
गोव्यातील तिघे जण कारमधून व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास येणार होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून या तिघांसह मोटर सायकल कार आणि सोबत आणलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. एका पिशवीमधून 5 किलो 232 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आणण्यात आली होती, त्याची किंमत  5 कोटी 32 लाख 20 हजार रुपये आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 चे कलम 39, 44, 84, 49 (ब) 51, 57 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण, सिंधुदुर्ग पोलीस, वनविभाग यांनी ही सयुक्तिक कारवाई केली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस', MHADAची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर टीकेची झोड 


MHADA Exam : म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न, चौघं ताब्यात, पुणे सायबर पोलिसांची कारवाई