सांगली : सांगलीतील म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटरसायकल कॅनॉलमध्ये पडल्याने ही दुर्घटना घडली. मिरज तालुक्यातील आरग- बेडग दरम्यान ही घडली असून मृत तिघेही शेजारच्या कर्नाटक राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे.

कॅनॉलवरून जाताना अंधारामुळे दुचाकी कॅनॉलमध्ये पडून या तिघांचा मृत्यू झाला. यापैकी एकाची ड्रायव्हिंग लायसन्समुळे ओळख पटली असून निगाप्पा मुंजे असे त्याचे नाव आहे. अन्य दोघांची अद्याप ओळख पटू शकले नाही. म्हैसाळ सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या भुलेगी पुलावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रात्री 8.30 च्या सुमारास तिघेही आरग येथून बेडगकडे निघाले होते.

यावेळी अंधार असल्याने अंदाज न आल्याने दुचाकी  कॅनॉलमध्ये जाऊन पडली. ज्यामध्ये तिघेजण गाडीसह पाण्यात बुडाले. काही वेळाने तिघांचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत शेजारच्या कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात झाली असून अन्य दोघाच्या मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.