ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या आटगाव या ठिकाणी कोरोनाच्या आजाराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने त्यांची मुलं अनाथ झाल्याची घटना घडलीय. या अनाथ मुलांच्या उदरनिर्वाहाचा तसेच शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.आई सीमा किरपण (वय 37) तर वडील हरिश्चंद्र किरपण (वय 43) असे मृत्यू झालेल्या आई-वडिलांची नावे आहेत. तर अभय किरपण (वय 17) व दामिनी किरपण (वय 16) अशी अनाथ मुलांची नावे आहेत.
महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्फत अनाथ मुलाना तात्काळ महिनाभर पुरेल एवढं रेशन किट व 2 हजार रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. या मुलांना बालसंगोपन योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलीय तसेच अनाथ प्रमाणपत्र व इतर शासकीय योजना देखील देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, भविष्यात तात्काळ स्वरूपात मदत व्हावी यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारने योग्य उपाययोजना आणणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांना तात्काळ स्वरूपाची मदत मिळू शकेल.
शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात असलेल्या किरपण कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना संकटात सापडलेल्या किरपण कुटुंबातील तीन सदस्य एकामागे एक मृत्युमुखी पडले आणि दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांची सावली हरपली. या कोविड-19 आजारामुळे अजय व दामिनी हे अनाथ झालेत. सर्वात आधी अजयचे वडील हरिश्चंद्र किरपण याचं 18 एप्रिल रोजी निधन झाले त्यानंतर 21 एप्रिल रोजी अजयची आजी सरस्वती किरपण (वय 65 वर्ष) व त्यानंतर 30 एप्रिल रोजी त्याची आई सीमा किरपण यांचे एकामागे एक निधन झाले.
घरात कमावणारा व्यक्ती कोणीच नाहीये, एक आजोबा आहेत तेही वयस्कर. सध्या दामिनी व अजय शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अनाथ झालेल्या या बालकांचे संगोपन कोण करणार? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. राज्य किंवा केंद्र सरकारने एखादी योजना अशी बनवावी जेणेकरून या संकट काळात अनाथ झालेल्या मुलांना तात्काल मदत होईल, अशी मागणी केली जात आहे.