मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले 'महा' चक्रीवादळ पुढे सरकत असून पालघर जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसणार आहे. आठ तारखेपर्यंत चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसणार असून मच्छिमारांनी दोन ते तीन दिवस मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले आहे.


पालघर जिल्ह्यातील 67 गावे समुद्र किनारी आहेत. चक्रीवादळाचा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये आठ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांसाठी गावांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  या चक्रीवादळामुळे 100 ते 120 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार असून यामुळे पालघरसह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांना पुढील तीन ते चार दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत येण्यास किंवा जवळच्या बंदरांमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात एकूण 2774 मच्छीमारी बोटी असून त्यातील 288 बोटी समु्द्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. त्यापैकी 150 बोटी या रोज ये-जा करणाऱ्या असून त्या परतण्याची शक्यता आहे. मात्र 138 बोटी या 10 नोटिकल मैलापेक्षा आत मासेमारीसाठी गेल्या असल्याने त्यांना लवकरात लवकर समुद्रकिनारी परतण्याच्या सूचना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'महा' चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.