या सगळ्या भेटी गेल्या काही तासांत वेगवेगळ्या शहरांत झालेल्या आहेत. पण त्या सगळ्या भेटींची साखळी नीट जोडली तर त्यात एक समान लिंक नक्कीच दिसू शकते. आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे दिल्लीत नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार हे सोनिया गांधींना भेटले होते. त्यानंतर सोनिया गांधींचे उजवे हात गडकरींना भेटल्यामुळे भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल.
अहमद पटेल आणि नितीन गडकरींमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना कुणीही भेटू शकतं हे खरं असलं तरी ज्या टायमिंगला ही भेट झाली ती महत्त्वाची. या वेळेला आपण भेटल्यावर त्याचे वेगळे अर्थ काढले जाणार याची माहिती असतानाही हे नेते भेटले. शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवरची सगळी ताकद काँग्रेसच्या भूमिकेवर आहे असं असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतं.
अपेक्षेप्रमाणे अहमद पटेल यांनी मात्र या भेटीत आपण महाराष्ट्राचा 'म' ही उच्चारला नसल्याचं सांगितलं. शेतकरी, रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती अहमद पटेल यांनी भेटीनंतर दिली.
आता अहमद पटेल आणि शेतीचा काय संबंध हे देव जाणो..पण या भेटीमुळे एक झालं..2014 नंतर गडकरींनी महाराष्ट्राच्या विषयात लक्ष घालणं बंद केलं होतं. पण सध्याची सत्ताकोंडी फोडण्यासाठी आता ते महाराष्ट्राच्या या सत्ताकारणाच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आले तेव्हाही त्यांनी गडकरींची भेट आवर्जून घेतली होती.
दिवसभरात चर्चेत राहिलेली दुसरी भेट म्हणजे पवार-राऊत..आज पवारांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत होती, त्याच्याच काही मिनिटे आधी संजय राऊत पवारांना भेटले. महाराष्ट्रातल्या निकालानंतरची त्यांची ही दुसरी भेट. युतीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजपचे नेते अजून एकदाही चर्चेसाठी भेटलेले नाहीत, पण पवार-राऊत मात्र वारंवार भेटत आहेत, यातच सेनेचा आक्रमकपणा का वाढलाय याचं उत्तर दडलं आहे.
या भेटीगाठींच्या साखळींमधली एक महत्त्वपूर्ण भेट तिकडे नागपुरातही पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना आणि भाजपच्या युतीतला समान धागा म्हणजे हिंदुत्वाचा. त्यामुळे शिवसेनेला मनवण्यासाठी संघाची मदत घेतली जातेय का असाही प्रश्न त्यामुळे चर्चिला जाऊ लागला.
निकालाला आता 14 दिवस उलटले आहेत. 9 नोव्हेंबरच्या आधी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भेटींचा सिलसिला नेमकं काय उत्तर घेऊन येणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.