साईबाबांच्या भक्तांसाठी गुरुपोर्णिमा उत्सवाला मोठे महत्व आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील साईभक्त या दिवशी साईंच्या चरणी लीन होतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास 4 ते 5 लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर उत्सवाला प्रारंभ झाला असून मंदिरातून पोथी आणि फोटोची मिरवणूक काढण्यात आली.
गुरुपौर्णिमेनिमित्त समाधी मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर गुरुस्थान या ठिकाणी अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान तीन दिवस चालनाऱ्या या उत्सवाचा उद्या मुख्य दिवस असून साई मंदिर उद्या भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार नसल्याचं साई संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर्षी चंद्रग्रहण असल्याने शेजारतीनंतर मंदिर बंद ठेवले जाणार आहे. दरवर्षी विविध उत्सवाच्या मुख्य दिवशी साईभक्तांना दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर रात्रभर उघडं ठेवलं जातं. मात्र यावर्षी प्रथमच ग्रहणामुळे मंदिर रात्री बंद राहणार आहे.