सातारा : सातारा येथील फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथे एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली. इथे बंधाऱ्यावर जात असताना पती, पत्नी आणि लहान मुलगी हे तिघंही त्यांच्या गाडीसह बंधाऱ्यात पडले. यावेळी बंधाऱ्या बुडणाऱ्या या कुटुंबाला वाचवण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकासोबत मात्र एकावर भलतंच संकट ओढावलं.
एका कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून गेलेल्या तीन तरुणांपैकी शुभम भिसृ हा युवक बंधाऱ्यात वाहून गेला. कुटुंब बंधाऱ्यात पडून वाहताना समोरुन येणाऱ्या या तीन तरुणांनी पाहिलं आणि मागचापुढचा विचार न करता या कुटुंबाला वाचवलं. पावसामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढली असून, प्रवाहही वाढला होता. अशातच ही घटना घडली. सदर घटनेनंतर महाबळेश्वर ट्रॅकरची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली.
सांगलीत घडली अशीच काहीशी दुर्घटना
सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ साखळी बंधाऱ्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. या तिघांचा शोध अद्यापही सुरु आहे. आटपाडी तालुक्यातील घाणंद इथे रविवारी (6 जून) संध्याकाळी ही घटना घडली. बराच शोध घेतल्यानंतर घाणंद तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्यालगत दोन मुलांचे कपडे आणि चप्पल सापडली आहे. रात्री उशिरा घटनास्थळी पाणबुडी दाखल झाल्या असून आज सकाळपासून मुलांचं शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली मात्र पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मुलांचा तपास लागला नाही. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.