अकोला : अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरणात तिन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विक्रम गावंडेसह, श्रीराम गावंडे आणि धीरज गावंडे यांनी रामदासपेठ पोलिसांकडे आत्मसमर्पण केल आहे.


किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येनंतर हे तीनही आरोपी फरार झाले होते. यातील विक्रम गावंडे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. आरोपी गावंडे कुटुंबातील वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक आहेत, तर मुलगा भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष आहे.

VIDEO | किसनराव हुंडीवाले हत्याप्रकरणात तिन्ही आरोपींना अटक | अकोला | एबीपी माझा



अकोल्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात रविवारी दिवसाढवळ्या दुपारी 12 वाजता किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. ही हत्या अकोल्यातील भाजपनेत्या आणि प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटुंबीयांनी घडवून आणल्याचं पोलीसांनी स्पष्ट केल आहे.

दरम्यान, काल रात्री दहा वाजता हूंडीवाले यांच्यावर अकोल्यातील खडकी स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि हूंडीवालेंचे नातेवाईक हंसराज अहीर देखील उपस्थित होते. हंसराज अहीर यांनी दोषींवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन यावेळी दिलं आहे.

कोण होते किसनराव हुंडीवाले?

*अकोल्यात सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक
*अकोल्यातील कौलखेड, खडकी भागातील राजकारणावर पकड
*गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
*केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक

संबधीत बातम्या

अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या, भाजयुमो पदाधिकाऱ्यासह वडील-भावावर संशय