भिंगार येथील कॅम्प भागात अटक करण्यात आलेले तीनही आरोपी गुरुवारी रात्री प्रतिबंधित क्षेत्रात संशयीतरित्या फिरत होते. इतकेच नव्हे तर यांपैकी एकाने लष्करी पोषाखही परिधान केला होता. लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
या तिघांना अडवल्यानंतर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी आतमध्ये प्रवेश कसा केला याची माहिती दिली नाही. भिंगारच्या कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी या तिघांना भिंगारमधील कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या चौकशीत यांपैकी दोघेजण उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील तर एक जण नगरजवळील पारनेर भागातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांवर लष्करी हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल तसेच बेकायदा लष्करी गणवेश घातल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.