सांगली : परीक्षा रद्द करण्यासाठी सांगलीतील दोन विद्यार्थ्यांनी धक्कादायक पाऊल उचललं. परीक्षेचा अभ्यास झाला नसल्याने आणि परीक्षा नकोच, या इराद्याने पेटलेल्या दोन मुलांनी शाळेत बॉम्ब असल्याचे सांगत शाळेला धमकीचे पत्र पाठवले आणि परीक्षा टाळण्याचा प्रयत्न केला.

सांगलीतील मणेराजुरीमधील पांडुरंग साळुंखे माध्यमिक शाळेतील 12 वर्षाच्या दोन मुलांनी हा प्रताप केला. या पत्राची शाळा आणि तासगाव पोलिसानी गंभीर दखल घेत बॉम्ब शोध पथक देखील बोलावले. पण हाती काहीच लागले नाही.

ज्या मुलाने हे पत्र मुख्याध्यापकाला दिले, त्याची अधिक चौकशी केली असता घटक चाचणीची परीक्षा टाळण्यासाठी आपण दोघांनी हा प्रताप केल्याचे त्याने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कबुलीमुळे पोलीस, शिक्षकाची उडालेली तारांबळ अखेर थांबली. पण या प्रकारामुळे शाळेच्या परीक्षेचं वेळापत्रक विस्कळीत झाले. पोलिसांनी या दोन मुलांची समजूत काढून त्यांना सोडून दिले.