मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंनी सुद्धा स्पष्टीकरण दिले. दरम्यान, आदित्यांवर नाहक चिखलफेक करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशात राजकारण सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकार आमने-सामने आले असून बिहार सरकारने सिबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे. विरोधी नेत्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून अस्वस्थ आहेत. वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा या सगळ्याशी काय संबंध. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने विरोधी पक्षातील काही जणांच्या पोटात दुखत आहे, अस्वस्थ आहेत. ज्यांना हे सरकार अजूनपर्यंत रुचलेलं नाही ते वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करत आहेत. महाराष्ट्राविरोधात हे संपूर्ण कारस्थान असल्याची मला शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणात जाहीर भूमिका मांडली. "मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.”, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.