अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज (5 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांनी प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना आज पहाटे 5:30 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.


अनिल राठोड हे 25 वर्ष अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. इतकेच नाही तर युतीच्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी अनिल राठोड यांचा सिंहाचा वाटा होता. अहमदनगरच्या राजकारणावर दबदबा असलेल्या अनिल राठोड यांची नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.


मात्र आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे. अनिल राठोड सर्वत्र  'भैया' नावाने प्रसिद्ध होते.


मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
"अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला. हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे," अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.