Bharat Jodo Yatra: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा अखेर महाराष्ट्रात पोहचली आहे. काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं स्वागत केलं. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून देण्यात आली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे या यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. खरं तर राज्यात महाविकास आघाडीतील एकी दाखवण्यासाठी आणि देशात भाजप विरोधात भक्कमपणे उभे राहण्यासाठी भारत जोडो यात्रा एक महत्त्वाचा पाऊल आहे. अशातच या यात्रेला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. आज राहुल गांधी यांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे. हे जाणून घेऊ.


भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस

सकाळी 6 वाजता- रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून पदयात्रा सुरु होणार आहे. 

सकाळी 10 वाजता- नायगाव येथे सकाळचा ब्रेक.

सकाळी 11 वाजता- पत्रकार परिषद. जयराम रमेश, नाना पटोले आणि इतर नेते पत्रकार परिषदेतील उपस्थित असतील.

दुपारी 4 वाजता- पदयात्रेला पुन्हा सुरवात होणार. 

संध्याकाळी 7 वाजता- नायगाव येथील कुशनूर एमआयडीसी गेट येथे संध्याकाळचा ब्रेक.

वजीरगांव फाटा येथे रात्रीची विश्रांती. 


दरम्यान, महाराष्ट्रातील (maharashtra) नांदेड मधील देगलूर येथे रात्री उशिरा दाखल झालेली राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी एक दुःखद घटना घडली आहे.  मंगळवारी सकाळी दुसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला टप्पा पार पडत असताना राष्ट्रीय सेवा दलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे यांचा  ह्रदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 80 वर्षी दुर्दैवी निधन झाले. मंगळवारी सायंकाळी राहुल गांधी यांची कॉर्नर सभा बिलोली तालुक्यातील भोपळा याठिकाणी होणार होती. दरम्यान, मात्र या सभेचे रूपांतर शोकसभेत झाले. ज्या सभेत भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र थीमवरील गाण्याचे अनावर होणार होते, त्याठिकाणी शोक सभा घेण्याची दुर्दैवी वेळ आली. या शोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), नाना पटोले, एच के पाटील, सुशीलकुमार शिंदे, प्रणीति शिंदे, सचिन सावंत, राजू वाघमारे, बाळासाहेब थोरात आदि कोंग्रेसचे जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितित ही शोकसभा घेण्यात आली.