रत्नागिरी : रत्नागिरी शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी मात्र हे चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कैद झाले आहेत.
रत्नागिरी शहराच्या भर वस्तीतल्या राधाकृष्ण नाका परिसरातील मलुष्टे स्टील अँड पाईप्स, बी. सी. ओसवाल, आझाद स्टोअर्स ही दुकाने चोरट्यांनी फोडली. एकमेकांना लागून असलेल्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील दरवाजे तोडत या चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश मिळवल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरून स्पष्ट होतं आहे.
या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये या तीन चोरट्यांचा दुकानातील मुक्त संचार पाहायला मिळत आहेत. आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहोत, याची जाणीव असलेल्या चोरटयांनी आपले चेहरे दिसू नयेत, यासाठी दुकानातीलच कापड चेहऱ्याला गुंडाळले होते.
रत्नागिरी शहराच्या या तीन दुकानातून चोरटयांनी जवळजवळ साडेचार लाख रुपयाचा ऐवज पळवून नेला आहे. मात्र, आता हे चोरटे सीसीटीव्हीत आढळून आल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांना थोडे सोपे जाणार आहे.
जानेवारी महिन्यात चोरट्यांनी अशाच पद्धतीने शहरातील पाचहून अधिक दुकाने एकाच रात्री फोडली होती. त्यांना सांगलीतून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. पण गेल्या आठ दिवसांपासून चोरटे रत्नागिरी शहरात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.
शहरातील ही तीन दुकाने फोडण्यापूर्वी चोरटयांनी गेल्या आठ दिवसांत शहराजवळील रो बंगले आणि दुकानांवर आपले हात साफ केले आहेत. यामुळे आता रत्नागिरी पोलिसांसमोर या चोरट्यांने पकडण्याचे आव्हान आहे.